आधी बीअर ऑफर, पतीला बोलण्यात गुंतवलं अन् मग सर्पदंश, पत्नीच्या प्लॅनने साऱ्यांना शॉक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खर्चासाठी पैसे देत नाही, या क्षुल्लक कारणातून पतीचा ‘काटा’ काढण्याचा प्रयत्न करून पत्नीने साथीदारामार्फत पतीला थेट सर्पदंश घडवल्याची धक्कादायक घटना घडली. बोरगडच्या उज्ज्वल नगरातील साईप्रसाद बंगल्यात हा प्रकार घडला. हल्ल्यातून बचावलेल्या पतीच्या फिर्यादीवरून संशयित पत्नीसह साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.

म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. उज्ज्वलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप हिच्यासह अज्ञाताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २७ जानेवारी रोजी सायंकाळी पत्नीने पती विशाल यांना बीअर पाजली. ते बीअरच्या नशेत असताना संशयिताने त्यांचा गळा दाबला, तर पत्नीने तोंड दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळा दाबणाऱ्या संशयिताने विशाल यांच्या गळ्यावर विषारी साप धरून त्यांना गळ्यावर दंश करवला. यानंतर घाबरलेल्या विशाल यांनी मध्यरात्री कसेबसे घराबाहेर पडत मित्रांकडे मदत मागितली. मित्रांनी मध्यरात्री एक वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर तत्काळ उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तक्रारीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांचे पथक तपासासाठी पोहोचले. त्यांनी विशाल यांचा जबाब नोंदविल्यानंतर या क्रूर घटनेची उकल झाली. त्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अतिखर्चावरून सतत खटके

विशाल यांची पत्नी एकता हिला ‘हायप्रोफाइल’ राहण्याची सवय होती. त्यासाठी तिला सातत्याने पैशांची निकड भासे. आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने आवाक्यात खर्च करावा, असे पती विशाल वारंवार सांगत. त्यातून दोघांत खटके उडाल्याने काही महिन्यांपूर्वी एकता घर सोडून लातूरमध्ये मैत्रिणीकडे वास्तव्यास गेली. पतीने तिची समजूत काढून पुन्हा घरी आणल्यानंतर पाच-सहा महिने संसार सुरळीत सुरू होता. मात्र, अचानक पत्नीसह साथीदाराकडून विशाल यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांसमोरही बनाव

पती घरातून बाहेर पडल्यावर एकता म्हसरूळ पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने ‘आमच्या घरात कोणीतरी हल्ला केलाय’, असा दावा तिने केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवतो, एवढेच सांगितले. तितक्यात जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला बळजबरीने सर्पदंश केल्याचा ‘कॉल’ आला. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. तितक्यात, संशयित महिलेने पोलिस ठाण्यातून पोबारा केला.

Source link

husband wife disputehusband wife fightnashik snake bite casenashk husband wife newsWife killed Husbandwife plan to kill husband
Comments (0)
Add Comment