राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गजानन खराटे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील मराठा सर्वेक्षणाचा विभागीय आयुक्तालयातून बुधवारी आढावा घेतला. त्यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या महापालिकांचे आयुक्त दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
‘पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम ७८ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ८५ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत २२ टक्के सर्वेक्षणाचे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याची ग्वाही पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पुणे विभागातील काही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ज्या गावातील किंवा तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा ठिकाणचे प्रगणक काम कमी झालेल्या ठिकाणी आजपासून (गुरुवारी) नेमण्यात येणार आहेत. याकरिता मागासवर्ग आयोगाने विशेष परवानगी दिली आहे,’ अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली.
राव म्हणाले, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेल्या गावांमधील प्रगणकांचे अप्लिकेशनवरील नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. तसेच कमी काम झालेल्या गावांमध्ये त्या प्रगणकांची नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी गाव आणि तालुकानिहाय प्रगणकांची नोंदणी गरजेनुसार केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
डॅशबोर्ड दिसणार …
सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रणालीच्या पडद्यावर डॅशबोर्ड दिसत नाही. त्यामुळे कोणत्या तालुक्यातील कोणत्या गावांमध्ये किती सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले याची माहिती घेणे अशक्य होत आहे, याकडे काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महागनरपालिकांनी आयोगाचे लक्ष वेधले. त्यावर येत्या दोन दिवसांत डॅशबोर्ड दिसू शकेल, अशी ग्वाही आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांसह महानगरपालिका आयुक्तांना दिल्याचे राव यांनी सांगितले.
मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. त्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील पाचही जिल्ह्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत विभागातील सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे विभाग