तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे : पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अतिरिक्त पोलिस महासंचालक अमितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सहआयुक्तदी प्रवीण पवार यांची नियुक्ती झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाने पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी सायंकाळी काढला. यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची होमगार्ड महासंचालकपदी, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांची अमरावती परीक्षेत्राच्या विशेष पोलिस महासंचालकपदी आणि अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी आयुक्तपदी अमितेशकुमार, गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी शैलेश बलकवडे यांची आणि अतिरिक्त आयुक्तपदी (उत्तर विभाग) मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पुण्याचे माजी सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या बदलीनंतर हे पद जवळपास दीड महिना रिक्त होते. त्या जागी पुणे राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असलेले प्रवीण पवार यांची नियुक्ती झाली.
पुण्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांचा पुण्यातील कार्यकाळ पूर्ण होवून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले होते. मात्र, त्यांना पोलिस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आल्याने त्यांची मुदतपूर्व बदली झाली. रितेशकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर जोर दिला होता. त्यांनी ११४ गुन्हेगारी टोळक्यांवर ‘मकोका’ची कारवाई केली. तर, शंभर गुंडांवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई केली आहे.