डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे. यामुळेच डोंबिवली मतदार संघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र आता भाजपकडून शिवसेनेत फूट पाडण्यात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करत गद्दारांना धडा शिकविण्याचे आवाहन केले होते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोण ताकदीचा उमेदवार दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघात निष्ठावान सैनिकाला उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे हा निष्ठावान मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ताकदवान ठरणार का? याची चर्चा सुरूच आहे. तर कल्याण लोकसभेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील वाद, कुरबुरी आणि कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. या वादावर पडदा पडल्याचे भासविले जात असले तरी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र उघडपणे आपली नाराजी व्यक्त करताना दिसतात, या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाकडून कायमच वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली होती. मात्र बुधवारी अचानक थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने चर्चेचा बॅनर लावत खळबळ माजवून दिली आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर असूनही कारवाई नाही
वास्तविक शहरात सत्ताधाऱ्यांविरोधात बॅनर लावले गेल्यास काही तासांतच ते बॅनर काढून फेकले जातात. अगदी विरोधी पक्षातील नेत्याचे स्वागतदेखील सत्ताधाऱ्यांना रुचत नाही. तरीही ठाकरे गटाकडून सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे बॅनर म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनातील चीड असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते व्यक्त करत आहेत. भाजपाकडून मात्र या बॅनरला विरोध करून विरोधकांचे महत्त्व वाढवले जाऊ नये, अशीच भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.