नालासोपारा पूर्वेकडील धनिवबाग परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. त्यानंतर या ट्रकला लागलेल्या आगीने अचानक रौद्ररूप धारण केले व पार्किंगमध्ये शेजारी उभ्या असलेल्या इतर ट्रक आगीच्या भक्षस्थानी आले. पाहता पाहता सर्वत्र आगीचा भडका उडाला व आगीचे लोण सर्वत्र पसरले. आग लागल्यानंतर स्फोट झाल्यामुळे एक ते दीड किलोमीटर परिसरातील काही घरांच्या काचा फुटल्याचे कळते.
भीषण आगीमुळे परिसरातील नागरिक देखील भयभीत होऊन घराबाहेर पडले. रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी या घटनेची माहिती अग्निशमन देत अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. वसई- विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास अथक परिश्रम घेत आगीच्या भक्षस्थानी आलेल्या या वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत सात मालवाहू ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये एखादा केमिकलचा ट्रक असावा त्यामुळेच इतकी भीषण आग लागली असावी प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र अचानक वाहनांना लागलेल्या या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.