लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव हे चार जिल्हे येतात. जानेवारी महिन्यात या परिक्षेत्रांतर्गत पहिला सापळा हा तीन जानेवारी रोजी यशस्वी झाला. यात बदनापूर तहसील कार्यालयाच्या महिला तहसीलदारासह महसूल सहायक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सात-बाऱ्यावर वारसांची सामाईक क्षेत्र म्हणून नोंद करण्यासाठी तहसीलदार व महसूल सहायकाने ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर बीड जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी गाय-म्हैस खरेदीची नोंद घेतल्याचे प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवक व खासगी व्यक्तीने तीन हजार रुपयांची लाच मागितली. १६ जानेवारीला अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना वाशी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस अंमलदारांसह एका खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले; तसेच १८ जानेवारीला अपंग असल्याचे प्रमाणपत्राची नोंद सेवापुस्तिका घेण्यासाठी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी, आरोग्य अंमलदार, आरोग्य सहायक या तिघांनी १५ हजार रुपये लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. २५ जानेवारी रोजी जात प्रमाणपत्राचा प्रस्ताव तयार करण्यासाठी माजलगाव येथील महसूल सहायक, महसूल कर्मचारी या दोघांना ३० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, बीड येथे संपादित केलेल्या मालमत्तेच्या मावेजाची रक्कम आई व मावशीच्या खात्यावर जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना, उपजिल्हाधिकारी, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच देशी दारूची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार, पोलिस उपनिरिक्षक या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली.
या कारवाई अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात दोन, जालना एक, बीड तीन आणि धाराशिव एक अशी सात सापळे रचण्यात आले आहे. या प्रकरणात १६ जणांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
राज्यभरात ४२ सापळे
लाचलुचपत विभागाच्या एक ते २९ जानेवारी दरम्यान झालेलया कारवाईत सर्वाधिक सापळे ठाणे आणि पुणे या विभागात रचण्यात आले आहे. सात सापळ्यांमध्ये १६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात छत्रपती संभाजीनगर विभाग पहिल्या क्रमांकावर होता. राज्यात मुंबई एका सापळ्यात दोन लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, ठाण्यामध्ये आठ सापळ्यांत ११, पुणे आठ सापळ्यांत १३, नाशिक सात सापळ्यांत १०, नागपूर सहा सापळ्यांत ७, अमरावती तीन सापळ्यांत तीन आणि नांदेड विभाग दोन सापळ्यांत दोन लाचखोरांना ताब्यात घेतले आहे. राज्यभरात ४२ सापळ्यांमध्ये एकूण ६४ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.