१.उद्धव ठाकरे यांनी पेणमधील सभेला संबोधित करताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मातोश्री निवासस्थानी लोक येत होते. आता मी राज्यभरात जाणार आहे. एका लोकसभा मतदारसंघात जितके विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व मतदारसंघात जाणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
२. देशातील मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. सीतारामन यांचे आभार मानतो, त्यांनी हा कार्यभार जड अंत:करणानं पार पाडला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सीतारामन म्हणाल्या आम्ही देशात चार जातींसाठी काम करणार, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी याचा त्यात समावेश होतो. निर्मला सीतारामन यांच्या धाडसाचे अभिनंदन करतो. तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे हे तुम्ही मोदींना सांगितलं ते बरं झालं. तुमच्या सोबतचा अदानी म्हणजे देश नव्हे, असं ठाकरे म्हणाले.
३.सीतारामन जी तुम्ही महिलांची गोष्ट सांगता, मग मणिपूरमध्ये का जात नाही?आता निवडणुकीत मतं पाहिजेत म्हणून तुम्ही महिलांसाठी काम करतो, असं सांगत आहात. तुम्ही बिल्कीस बानो यांच्याकडे जाऊन सांगा ताई तुम्ही महिला आहात, तुमच्यासाठी काम करणार आहोत, असं ठाकरे म्हणाले.
४.उत्तरेतील शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ आंदोलन केलं. त्यावेळी त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता तुम्ही तुमच्या त्यावेळच्या दाव्यानुसार अतिरेक्यांसाठी काम करु लागलात , असा परखड सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
५. अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. तुम्हाला हे देणार ते देणार असा भुलभुल्लैया काढतील. मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुप्पटीनं तिप्पटीनं वाढतील, असं ठाकरे म्हणाले. आम्हाला फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही, असं ठाकरेंनी म्हटलं.
६. आपल्याला पहिल्यांदा एक खड्डा काढावा लागेल. महिनाभर काम करावं लागेल, त्यावर मतांची माती टाकावी लागेल. त्यासाठी आपल्याला घरांघरांमध्ये जावं लागेल. घरोघरी जाऊन १० वर्षातील सरकारच्या कामाचा आढावा घ्या, २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी ज्या थापा मारल्या आहेत त्या लोकांना सांगा, असं ठाकरे म्हणाले.
७. मी मुख्यमंत्री असताना कोकणात दोन चक्रीवादळं आली होती. तोक्ते आणि निसर्ग चक्रीवादळ आदळली होती. त्यातील आपत्तीग्रस्तांना माझ्या सरकारनं केलेली मदत मिळाली की नाही हे सांगा, असं ठाकरे म्हणाले. कोकणात, तळकोकणात येऊन पाहणी केली आणि केंद्राच्या निकषांपेक्षा अधिक मदत केली. त्यावेळी पंतप्रधान आले नव्हते, एक पैसा मिळाला नव्हता.
८. महाराष्ट्रावरील संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नव्हते. आता निवडणुकीच्यापूर्वी महाराष्ट्राच्या वाऱ्या सुरु आहेत. मतं पाहिजे असताना ते मेरे प्यारे मेरे देशवासियों म्हणतात. मतं दिली की तुम्ही जगताय की मरताय, तुम्हाला चिरडून टाकू अशी भूमिका असते. तुम्हाला चिरडू हा त्यांचा विकास असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
९. राम मंदिर झालं ही अभिमानाची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमुखांचं ते स्वप्न होतं. मी आनंद व्यक्त करायला नाशिकला गेलो होतो. काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. गोदा आरती करायला गेलो होतो. काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केलं होतं. त्याच हेतूनं मी मोदींना सांगतो की राम हा तुमची प्रॉपर्टी नाही, देशातल्या करोडो राम भक्तांचा देखील आहे.
१०. राम मंदिराच्या सोहळ्यात एका निर्बुद्ध व्यक्तीला मोदींना देव मानायचं असेल तर माना पण त्यांची तुलना आमच्या दैवतासोबत करु नका. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. जे कोणी कुणाची तुलना आमच्या महाराजांसोबत करतात ते निर्बुद्ध आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागला तरी याद राखा आणि आता आपला शेतकरी आत्महत्या करतोय.आपत्तीत मदत मिळत नाही, पीक विमा योजनेतून काही मिळत नाही, अशी स्थिती आहे. ज्यांनी ज्यांनी महिलांची विंटबना केली त्याला कठोर शासन शिवाजी महाराजांनी केलं आहे, असं ठाकरे म्हणाले. मणिपूरमध्ये इतकं सर्व घडून मोदी तिकडे जायला तयार नाहीत. त्यामुळं मोदींची तुलना महाराजांबरोबर करणारे निर्बुद्ध आहेत, असं ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News