तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा देऊन कमी कालावधीत व कमी पाण्यात कष्ट कमी आणि उत्पन्न मिळण्याची हमी देणाऱ्या पिकांची निवड शेतकरी करीत आहेत. तालुक्यात कांद्याचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात आहे. पुन्हा एकदा चांगला भाव मिळेल या अपेक्षेने या वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. मात्र, वातावरणात कायम बदल होत असल्याने या पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे.
विक्रीयोग्य पपई चालल्या जळून
शेतकऱ्यांनी उत्पन्नाच्या आशा जागवीत कमी कालावधी आणि कमी पाण्यात येणाऱ्या तायवान जातीच्या पपईची निवड करून लागवड केली. पपईला लगडलेल्या पपई विक्रीसाठी येताच पाने पिवळी पडून पपई जाग्यावर जळून चालली आहे. वातावरण बदलामुळे पिकांना फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास अखेर नैसर्गिक आपत्ती, रोगराई हिरावून घेत आहे. यामुळे पपई फळबागेचे प्रचंड नुकसान होत आहे.
आंब्याचा मोहर जातोय गळून
ढगाळ वातावरणामुळे सर्व फळबागांवर रोगराई पसरत आहे. बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या झाडावरील मोहोरावर तुडतुड्यासह फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बागायतदारांना औषध फवारणी करावी लागत आहे.
कांद्यावर वातावरणाचा परिणाम
शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करून जवळपास दीड महिना झाला आहे. कांद्याचे पीक सध्या जोमात आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने कांदा उत्पादक त्रस्त आहेत. सध्या कांद्यात खुरपणी बरोबरच औषधांची फवारणी आवश्यक आहे. कांद्याला दीड महिना, दोन महिने, अडीच महिने याप्रमाणे अवधी असल्याचे कृषी विभागाच्या संशोधकांचे म्हणणे आहे. कांदा पिकावर सध्या फुलकिडीचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. शाळूज्वारीवर चिकटा पडून बुरशी रोगामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शेतकऱ्यांत भीती वाढत चालली आहे. यापूर्वीही सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचा कांदा विक्रीअभावी पडून राहिला. शेतकऱ्यांना जास्त काळ कांदा साठविणे शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कमी भावात विक्री करावा लागला होता. यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला होता.
शेतकरी मोठ्या अपेक्षाने शेतात नवनवीन प्रयोग करीत आहेत. मात्र, शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती, रोगराई, बेमोसमी पिकांचा मोठा फटका बसत असल्याने अनेकदा केलेला खर्च कसा वसूल करावा. हे कळायला मार्ग नाही. यामुळे शेतकरी सध्या वातावरणातील सततच्या बदलामुळे चांगलाच धास्तावला आहे.- गणेश क्षीरसागर, शेतकरी
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातून गहू, हरभरा, कांदा यातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी खत, औषधे यासह आदी खर्च भरमसाट केला आहे. पिके तशी जोमात आली आहे; मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे अखेर उभी पिके वाळत जात असल्याचे दिसत आहे.- रमेश सोनवणे, शेतकरी