राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. १५ फेब्रुवारीआधी हा निकाल येण्याची शक्यता आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲड. शरण जगतियानी यांच्याकडून करण्यात आल्यानंतर बुधवारी अजित पवार गटाचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांच्याकडून शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.
‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच झालेल्या नाहीत. निवडणूक घेऊ असे सांगितले; पण पक्षातील पदरचनाच नाही. कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. बैठकीचे शरद पवार अध्यक्ष होते. मात्र, निवडणूक न घेताच नेमणुका झाल्या. पक्षाची समिती केवळ कागदावर असल्याने जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष, खजिनदार असल्याचे बोलते, ती व्यक्ती सह्या कशी करू शकते,’ असा प्रश्न वकिलांकडून उपस्थित करून जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘अजित पवार, इतर समर्थक आमदार अपात्र ठरू शकत नाहीत. शरद पवार यांनी एकट्याने पत्रकार परिषद घेऊन सरकारमध्ये जायचे नाही, हे कसे ठरवले? आमदारांनी शिवसेनेबरोबर किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये हे कुठे लिहिले आहे? शरद पवार यांनीच २०१४मध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिला होता, ही बाब वकिलांनी विधानसभाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी न होण्याबाबत पक्षाच्या धोरणासंदर्भात पक्षाध्यक्ष किंवा पक्षाच्या कार्यकारिणीकडून कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवार आणि इतर समर्थक आमदारांच्या विरोधात कृती केल्याबद्दल अपात्र ठरू शकत नाहीत,’ असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. नार्वेकर यांनी दोन्ही गटांना त्यांच्या निवेदनातील राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना आणि त्यात बहुमत कोणाला आहे, हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News