नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेत काही दिवसांपासून नागरिक ‘ई-चलान’ अंतर्गत झालेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करीत आहेत. याबाबत पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर सायबर चोरट्यांनी वाहतूक ई-चलानबाबत व्हॉट्सॲपद्वारे बनावट मेसेज व्हायरल केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अन्वये, वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त आनंदा वाघ यांचे पथक सायबर चोरट्यांचा माग काढत आहेत. दरम्यान, ज्या नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे ई-चलानचे मेसेज आले असतील. त्यांनी त्यावर कोणतेही ई-पेमेंट न करता वाहतूक पोलिसांकडे चलानची खात्री करण्याची सूचना आयुक्तालयाने केली आहे. यासह वाहतूक पोलिसांच्या नावे कोणतेही ॲप कार्यान्वित नाही. त्यामुळे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या लिंकवरील ॲप डाउनलोड न करण्याचीही सूचना पोलिसांनी केली आहे.
काय आहे प्रकार?
‘प्रिय वाहक, तुम्हाला कळविण्यात येते की, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने तुमच्या वाहनावर ई-चलान अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. चलान क्रमांक MH19070164292782 या स्वरूपाचा आहे. तर MH15GW—- या क्रमांकाचे वाहन आहे. तुमची ओळख पटवून दंड भरण्यासाठी ‘वाहन परिवहन’ हे अॅप डाउनलोड करा. – नाशिक वाहतूक पोलिस’ या आशयाचा इंग्रजीतील मेसेज व्हॉट्सॲपवर काही वाहनचालकांना पाठविण्यात आला आहे. या मेसेजसह ‘vahan.parivan.apk’ असे ॲपही पाठविण्यात येते. मात्र, असा कोणताही मेसेज अथवा ॲप वाहतूक पोलिसांनी पाठविलेले नाही.
– ई-चलान अंतर्गत मेसेज ‘टेक्स्ट’ स्वरूपात येतात
– व्हॉट्सॲपद्वारे पोलिस मेसेज करीत नाहीत
– ई-चलान ठोठविल्यास वाहतूक पोलिसांकडील मशिनद्वारे तपासू शकतात
– https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ई-चलान तपासू शकता
फेक मेसेज व एपीके ॲप नागरिकांनी डाउनलोड करू नये. ई-चलान संदर्भात काही शंका, तक्रार किंवा अडचण असल्यास वाहतूक पोलिसांशी थेट संपर्क साधावा. मेसेज व्हायरल करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.- आनंदा वाघ, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक