उदयनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील सैनिकी स्कूलच्या मैदानाची पाहणी केली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा दौरा निश्चित झाल्याचे स्पष्ट असून त्यांचा हा सातारा जिल्ह्यातील दुसरा दौरा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साताऱ्याच्या दौऱ्यासाठी उदयनराजे भोसले यांनी निमंत्रित केले होत आणि त्यांनी येण्याचा शब्द दिला होता. त्यानिमित्ताने राजधानी साताऱ्यातील राजघराण्याच्या वतीने देण्यात येणारा सर्वात मानाचा पहिला शिवसन्मान पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्काराचं वितरण सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने काल सुरक्षेच्या दृष्टीने सैनिक स्कुलच्या मैदानाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सुनील काटकर, पंकज चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, विनीत पाटील आदी उपस्थित होते.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती केली. ज्याचे नाव जगाच्या पाठीवर घेतले जातेय, त्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून हा शिवसन्मान देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांची ऑनलाईन उद्घाटने, लोकार्पण होणार आहेत. २०१९ प्रचार सभेत सातारा जिल्ह्यातील विकासकामे करण्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिला होता. त्यांनी तो पाळला आहे. या विकासकामात कास पठाराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश तसेच जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळाचा विकास, कास तलाव, जिहे कटापूर योजना आदी विकासकामांची ऑनलाईन उद्घाटने होणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
शिवसन्मान पुरस्कार व जिल्ह्यातील विविध विकासकामांची उद्घाटनांची किनार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला असली तरी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीचे वारे यानिमित्ताने वाहू लागले आहे, प्रचिती येत आहे. त्याचीच ही पूर्वतयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोहळ्यानिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का या बाबत चर्चा सुरु आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ ऑक्टोबर २०१९ ला लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या प्रचारानिमित्त साताऱ्यात आले होते. तेव्हा उदयनराजेंनी नरेंद्र मोदी यांचा पगडी, शिवमुद्रा व गुरुवर्य लक्ष्मण इनामदार यांचे तैलचित्र भेट दिले होते. आता राजघराण्याच्यावतीने आणि तमाम शिवभक्तांच्या वतीने पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर केला आहे. त्या पुरस्काराचे वितरण सैनिक स्कुलच्या मैदानावर होणारच आहे. मोदी २०१९ ला साताऱ्याला आलेले तेव्हा विराट सभा झाली होती. जे पक्षात नव्हते, विचारधारा मानत नव्हते तेही भाषण ऐकायला उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ फेब्रुवारीला रोजी साताऱ्यातील पुरस्कार स्वीकारताना लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबतचे संकेत देणार का किंवा उमेदवार जाहीर करणार का याकडे लक्ष लागलं आहे. खासदार उदयनराजे हे गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात पुन्हा जोमानं सक्रीय झालेत, त्यामुळं महायुतीचे तेच उमेदवार असू शकतं, असं बोललं जातंय.
Read Latest Maharashtra News And Marathi News