महाविकास आघाडीच्यावतीनं प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि वर्षा गायकवाड यांनी केलं.
आज मविआची जागावाटपाबाबत पुन्हा एकदा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आज सुरु असलेल्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत भूमिका मांडली जाणार आहे. महाविकास आघाडीत वंचितला किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे. वंचितनं मविआच्या जागा वाटपाच्या दुसऱ्या बैठकीत सहभाग घेतला होता. आता तिसऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावल्यानंतर वंचितच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहावं लागेल.
मविआचा ४० जागांसंदर्भात निर्णय झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आजच्या बैठकीत उर्वरित ८ जागांचा तिढा सुटणार का हे स्पष्ट होईल. आज जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीला वंचितच्या प्रवेशाचा फायदा होणार?
वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांना गेल्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीनं शिवसेना ठाकरे गटासोबत गेल्या वर्षी आघाडी केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मविआला वंचितच्या प्रवेशाचा फायदा होणार आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस, वंचित यांची मविआ आणि भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती यांच्यात टक्कर होणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News