मेरी गॅरंटी है, मोदी गॅरंटी है… म्हणजे कोणती गॅरंटी, भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आपको कुछ नही होगा अभी मोदी गॅरेंटी है, असं बोलत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मोदींवर बरसले आहेत. ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना तुम्ही घाबरवलं. त्यांच्यावर तुम्ही ईडी आणि इन्कम टॅक्स सोडलेत. तुम्ही आज आमच्या माणसांना त्रास देत आहात. रवींद्र वायकर यांच्या घरी माणसे पाठवली. किशोरी पेडणेकर यांना त्रास दिला. अनिल परब यांच्या मागे लागलात. साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतील झोपडीमध्येही यांची पथकं गेली होती. ज्यांच्यावर आरोप केले होते, तुमचेच ते तोतले पण आता ते तुमच्या पक्षांमध्ये आले आहेत. त्यांच्या किती जणांच्या चौकशी सुरू आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्यांच्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन धाडी टाकले आहेत, आता तेच सांगतात की हे जवान आता माझ्या अवतीभोवती असतात हीच का मोदी गॅरेंटी? अशी ही टीका ठाकरेंनी केली आहे. गेल्या दहा वर्षात किती योजना आल्या? त्या किती पूर्ण झाल्या? असा सवाल करत उज्वला गॅस योजना, पीक विमा योजना या सगळ्याचा किती फायदा झाला, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
मी मुख्यमंत्री असताना आपण काम केलं. तुम्हाला चौकशी करायची असेल ना तर मुंबई महानगरपालिकेची नका करू. तर पीएम केअर फंडात लाखो करोडो रुपये गोळा केले त्याचा पहिला हिशोब द्या आणि मग माझ्या मुंबई महानगरपालिकेला हात लावा. भ्रष्टाचा आरोप करत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली पण त्यावेळेला तत्कालीन असलेल्या आयुक्तांनी सही केली मग त्याची चौकशी का नाही लावत? तो तुमच्या पदरी आला म्हणून पवित्र झाला का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांनी इकबाल मिरची बरोबर गैरव्यवहार केल्याचं तुम्ही ईडी चौकशीतून सिद्ध केलं. कारवाई केली. प्रफुल्ल पटेल यांनी देशद्रोह्यांबरोबर व्यवहार केला आहे हे सिद्ध केलं असताना मग आता प्रफुल्ल पटेल तुमच्याबरोबर आल्याबरोबर कुठे गेली चौकशी, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना अवकाळीची मदत मिळत नाही. त्यांच्या डोक्यावर कर्जासाठी आणि मरण्यासाठी शेतकऱ्याचा जन्म झाला आहे का? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या मदतीवरूनही ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.