पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगरातील भूषण टॉवरजवळील चौकात गुरुवारी रात्री उशिरा दुहेरी हत्येची घटना घडली. आरोपी सनी शिरूडकर याने किरणला स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन नवी दुचाकी फायनान्स करुन दिली होती. तसेच काही पैसे उधार देखील दिले होते. दुचाकी घेतल्यानंतर किरणने काही महिने कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरले. मात्र मागील काही महिन्यांपासून त्याने हफ्ते भरले नाही. यावरून किरण शेंडे आणि सनी यांचा वाद सुरु झाला. गुरुवारी रात्री किरण आणि सनी यांचा मोबाईलवर पैसे भरण्यावरून वाद झाल्यानंतर किरणने सनीला साई नगर येथील घरी भेटण्यासाठी बोलावले होते.
रात्रीच सनी त्याचा मित्र कृष्णकांत आणि मनीष मोहितेसोबत घटनास्थळी पोहोचला. त्याचवेळी किरणचे सनीसोबत पुन्हा भांडण झाले. याच भांडणात आरोपी किरण शेंडे त्याचा भाऊ योगेश शेंडे विक्की कोहळे आणि एका अल्पवयीन आरोपीने लाकडी दांडके आणि दगडाने वार करायला सुरुवात केली. यात सनी शिरूडकर आणि कृष्णकांत उर्फ कन्नू भट हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. वाठोडा पोलिसांना या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता दोघेही गंभीर अवस्थेत होते. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दोन आरोपी वर्ध्याच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी योगेश शेंडे तसेच किरण शेंडे यांना वर्धा येथून अटक केली. तसेच पारडी परिसरातून आरोपी विक्की सह एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी वाठोडा पोलीस अधिक तपास करत आहेत.