हायलाइट्स:
- साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू
- जबाब नोंदविण्यापूर्वीच महिलेचा अखेरचा श्वास
- राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
मुंबईः मुंबईतील साकीनाका येथे शुक्रवारी पहाटे एका नराधमाने महिलेवर अमानुष अत्याचार करीत बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेत नराधमाने केलेल्या अत्याचारामुळे पीडित महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय महिला आयोगाचं एक पथक मुंबईत दाखल झालं असून त्यांनी साकीनाकी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. (sakinaka rape case news)
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी आणि त्यांचे पथक आज सकाळी मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी साकीनाका पोलीस ठाणे आणि राजावाडी रुग्णालयात जाऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. त्यांनंतर त्यांनी प्रसार माध्यामांसोबत संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसंच, पोलिस आयुक्तांच्या त्या वक्तव्याचा दाखला देत नाराजीही व्यक्त केली आहे.
वाचाः गोवा, उत्तर प्रदेशमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग?; राऊतांनी दिले संकेत
मुंबईत भररस्त्यावर महिलेवर बलात्कार होतो ही धक्कादायक घटना आहे. पण, आम्ही सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही असं पोलीस आयुक्त विधान करतात ते अत्यंत निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही कळतं. पण पोलिसांचा एक धाक असतो, पोलिसांची दहशत असते, त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होतो, तो निर्माण करायला हवा. ते न करता अशी विधान करणं चुकीचं आहे, असं चंद्रमुखी देवी यांनी म्हटलं आहे.
‘महिलांवर अत्याचार होत आहेत. याचा अर्थ गुन्हेगारांचं मनोबल वाढलं आहे. त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नाही. पोलिसांचा काही धाक नाही. त्यामुळेच ते अशी कृत्य करत आहेत. महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या स्थापनेत एवढा उशीर का होत आहे? आयोग का स्थापन केलं जात नाही हे कळत नाही. हा महिलांशी संबंधित आयोग आहे. संवेदनशील मुद्दा आहे. लवकर आयोग स्थापन करायला हवा. राज्य सरकार आपल्या आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेत रस नाही. या संस्थांचं पुनर्गठन करावं, त्यात सदस्य नियुक्त करावेत यामध्ये सरकारला काडीचा रस नाही,’ अशी टीका चंद्रमुखी देवी यांनी केली आहे.
वाचाः किरीट सोमय्यांकडून उद्या आणखी गौप्यस्फोट; कोण असणार रडारवर