होय, मी पोलिसांसमोर गोळीबार केला कारण.. आमदार गणपत गायकवाड यांची कबुली, सनसनाटी गौप्यस्फोट

कल्याण : कल्याण पूर्वीचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश जगताप यांच्यासमोरच हा थरारक प्रकार घडला. जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचं गणपत गायकवाड यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितलं. माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्म संरक्षणासाठी मी गोळीबार केला, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली. त्याचवेळी मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही, असंही बेमालूमपणे त्यांनी सांगितलं. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल लोक विचारत आहेत.

या घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले. जर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढून गुंडाराज येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली. त्याचवेळी माझ्यावर होणारा अन्याय मी आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितला होता. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. पक्षश्रेष्ठींनी माझी दखल घेतली नाही. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचं क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असे गंभीर आणि सनसनाटी आरोपही त्यांनी केले.

गोळीबार केलं ते प्रकरण नेमकं काय होतं, गोळीबारापर्यंत वाद कसा पोहोचला?

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं, “मी १० वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. त्या जागा मालकांना पैसे देऊनही ते सह्या करण्यास येत नव्हते. त्यानंतर आम्ही न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. केस जिंकून ज्यावेळी सातबारा आमच्या नावावर झाला, त्यावेळी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मी दोन दिवसांपूर्वी देखील त्यांना विनंती केली होती की जबरदस्तीने तुम्ही ताबा घेऊ नका. न्यायालयात जा, तिकडून ऑर्डर आणा… न्यायालयाकडून जर ऑर्डर आणली तर तुमची जागा तुम्हाला देतो… पण त्यांनी दादागिरी सुरूच ठेवली. आज त्यांनी कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेऊ पाहत होते”.

“आजही संध्याकाळी जवळपास ४०० ते ५०० जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले होते. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात होता, त्यावेळी त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्म संरक्षणासाठी मी गोळीबार केला”, अशी कबुलीच गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली.

महेश गायकवाड गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार

दरम्यान, या घटनेत शिवसेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये तणावाचं वातावरण

या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Source link

ganpat gaikwadganpat gaikwad firing newsganpat gaikwad newskalyan bjp mla ganpat gaikwadKalyan newsshinde group mahesh gaikwadगणपत गायकवाडभाजप आमदार गणपत गायकवाडभाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबारशिंदे गट महेश गायकवाड
Comments (0)
Add Comment