हायलाइट्स:
- तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त
- गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई
- कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले
नागपूर : ग्रामीण गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बुटीबोरी परिसरात तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणलं आहे.
ग्रामीण गुन्हे शाखेचे एक पथक बुटीबोरी परिसरात गस्त घालत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर.जे. २७ जीए ८८०४ क्रमांकाचा एक ट्रक आंध्र प्रदेशातून निघाला असून तो नागपूर मार्गे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पाळत ठेवली. यावेळी हिंगणघाट ते नागपूर या मार्गावर हा ट्रक आढळून आला.
पोलिसांनी हा ट्रक थांबवून झडती घेतली असता तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचा ११०४ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. ट्रकचालक रोहीत लखन जयस्वाल (वय २५, रा. पना, मध्य प्रदेश) आणि त्याचा क्लिनर सहकारी सोनू कवरसिंग चौहाण (३२, रा. भिवानी हरियाणा) याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, गुन्हे शाखेचे अनिल जिट्टावार, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे आणि त्यांच्या चमूने केली.
नागपूरमध्येच का आणला मोठ्या प्रमाणात गांजा?
दक्षिणेतील राज्यांमध्ये गांजाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. हा गांजा मध्य भारत तसेच उत्तरेकडे पोहोचवण्याच्या प्रक्रियेत नागपूर हे महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपूर हे गांजा तस्करीचं हब म्हणून उदयास आल्याचं सांगितलं जात आहे.