हायलाइट्स:
- बाप्पाचा असा देखावा तुम्ही पाहिलाच नसेल!
- मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने घरात केलं अप्रतिम डेकोरेशन
- गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या परिश्रमानंतर हा देखावा पूर्णत्वास
सांगली : बदलत्या जीवनशैलीत बारा बलुतेदार जवळपास लोप पावले आहेत. गावगाड्यातील बारा बलुतेदारांचे महत्व नव्या पिढीला लक्षात यावे, यासाठी सांगलीतील एका अभियंत्याने घरातील गणेशासमोर बारा बलुतेदारांचा देखावा साकारला आहे. शहरातील ब्राम्हणपुरीच्या खाडीलकर गल्लीत राहणारे सुदन जाधव यांच्या घरातील बारा बलुतेदारांच्या देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सुदन जाधव यांना नेहमीच ऐतिहासिक वास्तू, इतिहास, स्थापत्य जीवनशैली, लोकसंस्कृती, पुरातन वस्तू यांचे आकर्षण असते. यापूर्वीही त्यांनी शिवकालीन गडकिल्ल्यांचे देखावे साकारले होते. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी घरच्या गणपतीसमोर बारा बलुतेदारांचा देखावा साकारला आहे. यासाठी त्याना कुटुंबीयांचीही साथ मिळाली. नोकरी सांभाळतच त्याने देखावा तयार करण्याचे काम सुरू केले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या परिश्रमानंतर हा देखावा पूर्णत्वास आला आहे.
विशेष म्हणजे हा देखावा पूर्णत: पर्यावरण पूरक आहे. शाडू मातीच्या माध्यमातून शेतकरी, सोनार, लोहार, चांभार, कुंभार, सुतार, न्हावी, शिंपी, परिट, गुरव, मातंग अशा बारा बलुतेदारांच्या आकर्षक, सुबक आणि रेखीव मूर्ती, त्यांची घरे, गुरे आणि अवजारेही साकारण्यात आली आहेत.
याशिवाय बारा बलुतेदारांचे ग्रामजीवन, मातीची घरे, मातीची भांडी, शेतकऱ्याचे शेत, शेतातील पिके, त्याच्या हातातील अवजारे, धान्याची पेटारे, धोब्याच्या हातातील कापडे, लोहाराच्या हातातील हातोडा, मातीची भांडी तयार करणारा कुंभार, केस कापून घेणारा ग्राहक आणि त्याच्या हातातील दर्पण, सुताराच्या हातातील छन्नी-हातोडा, शिंपायाच्या हातातील वीणकामासाठी लागणारा सुई-दोरा, मंदिरात पूजा-अर्चा करणारा गुरव, आदींची जीवनशैलीही दाखवली आहे. याशिवाय घरे, घरांसमोरील झाडे, अंगण, पारावरचा कट्टा, दळण-वळणाची साधने यांचाही यात समावेश आहे. वेगळेपणामुळे जाधव यांचा हा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.