हायलाइट्स:
- मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?
- संजय राठोड यांनी केला मोठा खुलासा
- मी स्वतःहून राजीनामा दिला मंत्री संजय राठोड यांचं स्पष्टीकरण
सोलापूर : पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केलेले संजय राठोड यांनी आता आपण राजीनामा का दिला? याचा एक मोठा खुलासा केला आहे. राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव आणला नव्हता परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलीन होणार नाही याची दक्षता घेत मी स्वतःहून राजीनामा दिला असं स्पष्टीकरण मंत्री संजय राठोड यांनी दिलं आहे.
ते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विरोधकांनी अधिवेशन सुरू करू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मी स्वत: राजीनामा दिला असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. बंजारा समाजाचा सहविचार सभेच्या निमित्ताने आमदार राठोड हे सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामगृहमध्ये यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज तिसऱ्यांदा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ‘गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मी गेले ३० वर्षे सार्वजनिक जीवनात आले. या माझ्या कारकिर्दीतूनच मला उठवण्याचा प्रयत्न झाला’, अशी टीकाही याआधी संजय राठोड यांनी केली होती.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, याच कारणामुळे मी मंत्रिपदापासून बाजूला होत आहे, असे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचेही संजय राठोड म्हणाले होते. संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळी सोबत अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते. चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका असल्याचे ते म्हणाले होते.