माघी गणेश जयंती 2024 तारीख आणि मुहूर्त !
चतुर्थी तिथी – 12 फेब्रुवारी 2024 ला संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 2 वाजून 43 मिनिटांपर्यंत
गणेश पूजा मुहूर्त – 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपर्यंत ते दुपारी 1 वाजून 58 मिनिटांपर्यंत.
शुभ योग – गणेश जयंतीदिवशी सिद्ध योग रात्री 2 वाजून 37 मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ होणार आहे. या दिवशी गौरी तृतीया व्रत सुद्धा आहे.
चंद्रोदय वेळ – 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटे ते 8 वाजून 54 मिनिटांपर्यंत, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 18 मिनिटांपर्यंत ते 10 वाजून 4 मिनिटांपर्यंत.
गणरायाचे तीन अवतार
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्रीगणेश जयंतीचा दिवस असतो.
विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात?
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे. मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा, मोदकाचा नैवेद्य
दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गणपतीबाप्पाचे विसर्जन केले जाते. या तिथीला स्नान, दान,जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात. या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशिर्वाद सदैव राहो हीच मनोकामना आहे.