हायलाइट्स:
- प्रविण दरेकर यांचं वादग्रस्त वक्तव्य
- राष्ट्रवादीवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर
- पुण्यात बोलताना केलं वक्तव्य
पुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवरून टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे.
‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. शिरूर इथं राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त ‘जय मल्हार क्रांती संघटने’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. यावेळी बोलतानाच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आलं नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’ असं ते म्हणाले.
दरेकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
दरम्यान, या सगळ्या वादाविषयी प्रविण दरेकर यांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.