नुकतेच चित्रित झालेले तर काही प्रदर्शनाची तारीख न मिळाल्यामुळे रखडलेले सिनेमे यंदा प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटांच्या क्लॅशची मालिका नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून पाहायला मिळणार आहे. विशेषत: ईद ते ख्रिसमस या काळात अनेक चित्रपट आमनेसामने येतील. याबाबत चित्रपट निर्माते आणि चित्रपट व्यवसाय विश्लेषक गिरीश जोहर सांगतात, ‘हे क्लॅश आज नाही तर उद्या होणारच होते. जे निर्माते आपला चित्रपट घेऊन फक्त प्रदर्शनाची चांगली तारीख मिळावी म्हणून वाट बघत होते, ते आता या वर्षात चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. तर या चित्रपटाच्या सोबतीनं काही नवीन सिनेमेसुद्धा येतीलच, पण प्रेक्षकच ठरवतील नेमकं कोण बाजी मारणार ते!’
ईदपासून चित्रपट आमनेसामने
ईदला सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होतो, हे गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळणारं चित्र आहे. मात्र यावर्षी सलमान ईदला कोणताच चित्रपट प्रदर्शित करत नसल्यानं अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचे चित्रपट आमनेसामने येतील. अजय देवगणच्या ‘मैदाना’सोबत अक्षयचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच काळात कमल हसनचा ‘इंडियन २’सुद्धा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. सूर्याचा ‘कांगुवा’ तर चियान विक्रमचा ‘थंगालन’देखील याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अजय देवगणच्या ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटासमोर जॉन अब्राहमच्या ‘तेहरान’चं आव्हान असणार आहे. तसंच अजयचा मार्चच्या सुरुवातीला ‘शैतान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी संजय दत्तचा ‘डबल स्मार्ट २’ प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मार्च महिन्यात सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ आणि अदा शर्माचा ‘बस्तर’ क्लॅश होणार आहे.
प्रदर्शनाची रांग
जूनमध्ये दिग्दर्शक कबीर खानच्या कार्तिक आर्यन स्टारर ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून या चित्रपटाला टक्कर द्यायला कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर या वर्षीची सर्वात मोठी टक्कर १५ ऑगस्टला अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मध्ये होणार आहे. तर ख्रिसमसला आमिर खान ‘सितारे जमीन पर’ घेऊन येत असून त्याच दिवशी अक्षय कुमार ‘वेलकम टू जंगल’ हा चित्रपट घेऊन येत आहे. तर २ ऑक्टोबरला अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’, दसऱ्याला शाहिद कपूरचा ‘देवा’ तर दिवाळीला कार्तिक आर्यनचा ‘भूलभूलैया ३’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
‘कॅल्श’पट
८ मार्च: शैतान, डबल स्मार्ट
१५ मार्च: योध्या, बस्तर
१० एप्रिल: बडे मियां छोटे मियां, मैदान, इंडियन २
२६ एप्रिल: औरों में कहां दम था, तेहरान
१४ जून: चंदू चॅम्पियन, इमर्जन्सी
१५ ऑगस्ट: सिंघम अगेन, पुष्पा २, ख्रिसमस, वेलकम टू जंगल, सितारे जमीन पर
संकलन- सुरज कांबळे