हायलाइट्स:
- खेड तालुक्यातील धरणे भरली
- जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ
- प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना
रत्नागिरी :खेड तालुक्यातील धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जगबुडी नदी इशारा पातळीच्या जवळून वाहू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांना व खेड शहरातील व्यापाऱ्यांना नगरपरिषद आणि तालुका प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जगबुडी नदी सध्या ५.५० मीटर उंचीवरुन वाहत आहे. इशारा पातळी ६ मीटर इतकी आहे, तर धोक्याची पातळी ७ मीटर आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढल्याने पुराचा धोका लक्षात घेत प्रशासन सतर्क झालं आहे.
नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तूंची काळजी घेता यावी म्हणून वेळीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून अतिवृष्टीची शक्यता
खेड तालुक्यात पुढी दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील नातूवाडी धरण, पिंपळवाडी धरण भरून वाहू लागल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. खेड शहरासह तालुक्यात तुर्तास पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र अचानक मोठा पाऊस झाल्यास पाणी पातळी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाय म्हणून जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘सह्याद्री खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा मोठा परिणाम जगबुडी नदीच्या पाणी पातळीवर होतो. खेड तालुका प्रशासन या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे,’ अशी महिती प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.