हायलाइट्स:
- राज्यात आजही अतिवृष्टीचा इशारा
- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र
- कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तसेच विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : गेल्या आठवडाभरापासून पावसाचा मुक्काम असलेली मुंबई सोमवारीही चिंब झाली. आज, मंगळवारी पालघर, ठाणे, मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता असून, त्यानंतर हा प्रभाव ओसरेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पालघरला आज, मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरालाही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून, गुजरातमध्येही ती तीव्रता आहे. त्याचा प्रभाव कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तसेच विदर्भावर असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी स्पष्ट केले. या प्रभावामुळे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. घाट परिसरातही हा प्रभाव असून आज, मंगळवारनंतर पाऊस कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईत सोमवारी कुलाबा येथे ८.४ तर सांताक्रूझ येथे ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र नवी मुंबई, डोंबिवली, ठाण्यातील काही भाग, दादर, परळ, जोगेश्वरी येथे रविवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. सोमवारी सकाळी ८.३०पर्यंत २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३९.४ तर कुलाबा येथे २५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणू जिल्ह्यात सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ८२.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पालघर जिल्ह्यात उद्या, बुधवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहून, त्यानंतर तो ओसरेल, असा अंदाज आहे. या काळात उर्वरित कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे.
उर्वरित राज्यातील स्थिती
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दिशेने पुढील ४८ तासांमध्ये प्रवास करण्याचा अंदाज आहे. याचा प्रभाव आज, मंगळवारनंतर कमी होईल. मात्र या काळात विदर्भामध्येही यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, अमरावती अशा तुरळक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जना आणि विजांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही आज परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार येथेही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.