पुणे : परवेज शेख
व्यापाऱ्यावर पाळत ठेवून तो व्यापारी टिंबर मार्केट येथे गेल्यानंतर त्याच्या पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील ११ लाख ५० हजार रूपये लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज डोळयात तेल घालून पाहिल्यानंतर चोरटयाचा पर्दाफाश झाला असून अखेर त्याला बोपखेल फाटा येथून अटक करण्यात आली आहे.
रामकेवल राजुकुमार सरोज उर्फ राकेश प्रदीपसिंग रजपुत (४६, सध्या रा. ज्ञानदा सोसायटी, चाकण, पुणे, मुळ रा. पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी रामकेवल याच्याविरूध्द पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यात ३० गुन्हे दाखल आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी महेश शिवाजी नाळे (३५, रा. निर्मल टाऊनशिप,काळेपडळ, हडपसर) हे टिंबर मार्केट येथे कामानिमित्त गेले होते. आरोपीने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. नाळे हे त्यांची दुचाकी पार्क करून कामासाठी गेले असताना आरोपीने त्यांच्या डिक्कीतील ११ लाख ५० हजार रूपये लंपास केले. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामधून भरदिवसा चोरी झाल्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी तपास पथकातील पोलिसअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हयाच्या तात्काळ तपासाबाबत आदेश दिले. पोलिसांनी परिसरातील आणि येण्या- जाण्याच्या रस्त्यावरील तब्बल ५०० सीसीटीव्ही फुटेज डोळयात तेल घालून तपासले. त्यामध्ये एकजण संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याची माहिती काढण्यास सुरूवात केली असता तो बोपखेल फाटा येथे असल्याचे पोलिसांना समजले. खडक पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.