हायलाइट्स:
- मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने नाराजी
- मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा
- मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आक्रमक भूमिका
औरंगाबाद : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाला तीन महिने उलटूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा अडवणार आहोत,’ असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह बांधावे, ‘सारथी’ संस्थेचे उपकेंद्र द्यावे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची १० लाख रुपये कर्ज प्रस्तावाची मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली होती.
या पार्श्वभूमीवर संघटनेचे समन्वयक आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली होती. हे प्रश्न १५ दिवसात सोडवण्याचं आश्वासन देऊनही मागण्या प्रलंबित असल्याबाबत संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबाद शहरात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवणार आहोत, असं समन्वयक रमेश केरे यांनी सांगितलं. तसंच येत्या ७ ऑक्टोबर रोजी राजकीय पक्षप्रमुखांच्या निवासस्थानासमोर शासनाच्या ‘जीआर’ची होळी करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढण्याचं नियोजन सुरू आहे, अशी माहिती केरे यांनी दिली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला समन्वयक अप्पासाहेब कुढेकर, राहुल पाटील, किरण काळे, भरत कदम, निवृत्ती मांडकीकर, मनोज मुरदारे आदी उपस्थित होते.