हायलाइट्स:
- रुपाली चाकणकर यांचा पुन्हा दरेकरांविरोधात हल्लाबोल
- अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांनाही टोला लगावला?
- चाकणकर यांचं नगरमधील वक्तव्य चर्चेत
अहमदनगर : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पारनेर तालुक्यातील कार्यक्रमातही सडकडून टीका केली. ‘या वक्तव्यावरून विरोधकांचे वैचारिक दारिद्रय लक्षात येते. त्यांनी एखादं गाणं म्हटलं, नृत्य केलं तर ती कला. मात्र, लोककलावंतानी हे केलं तर ते नाचे, असे यांचे खालच्या पातळीवरील विचार आहेत,’ अशी टीकाही चाकणकर यांनी केली. त्यामुळे दरेकर यांच्यावर टीका करताना चाकणकर यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा आहे.
पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाकणकर बोलत होत्या. यामध्ये त्यांनी लंके यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. पुढील २५ वर्षे लंके येथून विजयी होत राहतील, असं सांगून लंके यांनी यापुढील निवडणुकांत राज्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी जावं, असं आवाहन केलं. तसंच त्यांना पुणे जिल्ह्यात येण्याचं निमंत्रणही चाकणकर यांनी दिलं आहे.
दरेकर यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्याचा चाकणकर यांनी समाचार घेतला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे,’ अशी टीका दरेकर यांनी केली होती. चाकणकर यांनी कालच त्यांना उत्तरही दिलं होतं. आज पुन्हा या विषयावर त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, विरोधक ज्या पद्धतीने टीका करत आहेत, त्यावरून त्यांच्या विचारांची पातळी लक्षात येते. त्यांनी एखादं गाणं म्हटलं, नाच केला तर ती कला आणि लोककलावंतांनी नाच केला तर ते नाचे. म्हणजे आपला तो गंर्धव दुसऱ्याचे ते नाचे, असा विचार या विरोधकांचा आहे. महिलांना दुय्यम वागणूक देणे ही त्यांची संस्कृती आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे की गाल रंगवता वगैरे आम्हालाही येतात. राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यामध्ये तरबेज आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीचा नव्हे राज्यातील तमाम महिलांचा अपमान करणाऱ्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा गाल आणि थोबाड रंगवता येते, हे आम्ही दाखवून देऊ. पुढे त्यांनी म्हणू नये की माझ्या वाक्याचा विपर्यास्त केला. पण लक्षात ठेवा की आम्ही मराठी शाळेत शिकलो आहोत. मराठी म्हणींचा अर्थ आम्हालाही कळतो,’ अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी दरेकरांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, ‘अशा दरिद्री विचारांची माणसे विधान परिषेदेसारख्या सभागृहात आहेत, हे दुर्दैव आहे. हा त्या सभागृहाचाही अपमान आहे. मात्र, भाजपमध्ये आयात केलेली ही माणसे फक्त टीका करण्यासाठीच आहेत. त्यासाठी त्यावरच त्यांचे भवितव्य आहे. त्यामुळे आपल्यावर टीका करून जर कोणाचे घर चालत असेल तर चालू द्या. आपण आपले काम करत राहू,’ असंही चाकणकर म्हणाल्या.