पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू

हायलाइट्स:

  • बारामती तालुक्यातील अंजनगाव इथं हृदद्रावक घटना
  • पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू
  • एक मुलगी बचावल्यानं उघडकीस आली घटना

म. टा. प्रतिनिधी । बारामती

पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातल्या अंजनगाव येथे घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली. तिनं आरडाओरडा केल्यानं हा प्रकार उघडकीस आला. (Mother, Daughter Drown in Farm Pond)

अश्विनी सुरेश लावंड (वय ३५), समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चारण्यासाठी जातात. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीने पिण्यासाठी पाणी काढायला समृद्धी शेततळ्याच्या बाजूला गेली होती. त्यावेळी शेततळ्यात वापरलेल्या प्लास्टिक कागदावरून तिचा पाय घसरला. मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला. त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र, ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

वाचा: शिवरायांचा अवमान करणारा छिंदम गोत्यात; ‘या’ गुन्ह्यात अटक

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मृतदेह शेततळ्यात असल्याने उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील आर्यनमॅन सतिश ननवरे, सुभाष बर्गे, महादेव तावरे यांच्या यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्वर जुबली रुग्णालयात पाठवण्यात आले.

वाचा: ‘कत्तलीच्या यादीत बैलांचा समावेश होऊ शकतो का?’

Source link

BaramatiBaramati News Todaymother-daughter drown in farm pondPuneपुणेबारामतीशेततळ्यात बुडून मायलेकींचा मृत्यू
Comments (0)
Add Comment