एटीएम कार्डद्वारे पैसे काढून नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर अटकेत!

हायलाइट्स:

  • एटीएम कार्ड क्लोन करून पैसे लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश
  • मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक
  • सापळा रचून ठोकल्या बेड्या

अहमदनगर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडील एटीएम कार्ड क्लोन करून नंतर त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणार्‍या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात अहमदनगर सायबर पोलिसांना अखेर यशं आलं आहे. सुजित राजेंद्र सिंग (रा. वसई-विरार, ठाणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी वसई (ठाणे) येथून अटक केली. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही त्याने असे गुन्हे केल्याचं तपासात उघड झालं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.

नगरच्या भिंगार परिसरात मे महिन्यात बनावट एटीएम कार्डद्वारे एक लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजवरून धीरज अनिल मिश्रा आणि सुरज अनिल मिश्रा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग याचे नाव समोर आले. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

दहशतवादी जानचे डी कंपनीशी दोन दशकांपासून संबंध; एटीएस पथक दिल्लीला जाणार

अखेर ११ सप्टेंबर रोजी नगर सायबर पोलिसांना त्याच्याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी सुजित सिंग वसईमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्याला अटकेसाठी पथके रवाना केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांचे पथक वसईला गेले. आरोपी चलाख असल्याने त्याला त्याच हुशारीने अटक करणे आवश्यक होते. पोलिसांना त्याची गुन्ह्याची पद्धत माहिती झाली होती. त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांनी सापळा रचला. पोलिसांचा संशय न आल्याने आरोपी त्यात अडकला. त्याला अटक करून नगरला आणण्यात आले.

आरोपीकडून एक लॅपटॉप, पाच मोबाईल हँडसेट, एक संगणक, १७ पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे चार स्कीमर मशीन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड करण्यासाठी लागणारे ४६ कोरे कार्ड, सहा विविध कंपन्यांचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सूत्रधार सुजित राजेंद्र सिंगच्या विरोधात यापूर्वी मुंबईसह गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Source link

ahmednagar news in marathicrime newsअहमदनगरअहमदनगर क्राइम न्यूजअहमदनगर पोलिस
Comments (0)
Add Comment