हायलाइट्स:
- मुलाने धारदार हत्याराने भोसकून केला वडिलांचा खून
- साताऱ्यातील घटनेनं खळबळ
- आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
सातारा : किरकोळ कारणातून घरगुती वाद झाल्यानंतर संतापलेल्या मुलाने वडिलांना मारहाण करून धारदार हत्याराने भोसकून वडिलांचा खून केला. ही घटना सातार्यातील मंगळवार पेठेत घडली असून, यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बबन पांडुरंग पवार (वय ५६, रा. मंगळवार पेठ, सातारा) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सूरज पवार (वय २८) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
या प्रकरणी मृत बबन पवार यांचे भाऊ राजू पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन पवार हे त्यांचा मुलगा सूरज याच्यासोबत वास्तव्य करत होते. तक्रारदार राजू पवार हे त्यांचे शेजारी आहेत. १३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता बबन पवार व सूरज पवार यांच्यामध्ये घरी वाद सुरू असल्याने परिसरात जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.
हा आवाज ऐकूण तक्रारदार राजू पवार हे बबन पवार यांच्या घरात गेले असता सूरज त्याच्या वडिलांना मारहाण करत होता. राजू पवार यांनी बाप-लेकामधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.
बाप-लेकामधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या सूरज पवार याने घरातील धारदार चाकू घेऊन वडिलांवर वार केला. या मारहाणीत बबन पवार यांच्या छाती व पोटालगत गंभीर जखम झाली व ते रक्तबंबाळ झाले. गंभीर जखमी अवस्थेतील बबन पवार यांना राजू पवार यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र बबन पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर वडिलांचा खून केल्याप्रकरणी सूरज पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.