पुणे : परवेज शेख
आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन दिवस सुरू असलेल्या शिवजयंती महोत्सवाची शिवजयंती दिनी मोठ्या उत्साहात सांगता झाली. गांधी मैदान, राजवाडा येथून विराट शाही मिरवणूक काढण्यात आली तर आ. शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर शिवरायांची महाआरती झाली.
महाआरतीला विराट जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.आ. शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारी असे तीन दिवस ‘शिवजयंती महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. दि. १७ फेब्रुवारी रोजी नंदेश उमप यांचा ‘शिव सोहळा’ या ऐतिहासिक कार्यक्रमातून सातारकरांनी शिवरायांच्या जीवनपटाची अनुभूती घेतली तर दि. १८ फेब्रुवारी रोजी किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि सुनील लाड यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान झाले. दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीदिनी आ. शिवेंद्रराजेंच्या प्रमुख उपस्थितीत शिव प्रतिमेच्या पालखीची ऐतिहासिक, विराट आणि शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते केरळचे १०० कलाकारांचा सहभाग असलेले ‘कथकली मेलम’ वाद्यवृंद ! याशिवाय हत्ती, घोडे, उंट, पारंपरिक वाद्य, वारकरी, हजारो फेटेधारी मावळे यांच्यामुळे मिरवणुकीला रंगत आली. मिरवणुकीत हजारो शिवप्रेमी सहभागी झाले तर मिरवणूक पाहण्यासाठी अवघा जनसागर लोटला. यामुळे सातारा शहरातील राजपथ आणि कर्मवीर भाऊराव पाटील पथाला महाकाय यात्रेचे स्वरूप आले होते.
मिरवणुकीची सांगता शिवतीर्थावर झाल्यांनतर आ.शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर शिवरायांची महाआरती करण्यात आली. यावेळी हजारो शिवप्रेमींनी उपस्थित होते.