हायलाइट्स:
- सदाशिव भुंबर या तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभादीराजे यांची फेसबुक पोस्ट.
- सरकारने आता तरी जागे व्हावे, असे आवाहन खासदार संभाजीराजेंनी सरकारला केले आहे.
- आत्महत्या न करता धैर्याने लढा देऊ- संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन.
मुंबई: जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात सदाशिव भुंबर या मराठा समाजाला आरक्षण आणि रोजगार व्यवसायाच्या संधी नसल्याचे सांगत नैराश्यातून आत्महत्या केली आहे. याचे पडसाद मराठा समाजात उमटत आहेत. या घटनेनंतर खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आघाडी सरकारला आवाहन केले आहे. आरक्षण, रोजगाराच्या संधी नसल्यामुळे, तसेच व्यवसायासाठी पाठबळही नसल्याने अनेक मराठा तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. या न्यूनगंडातून ते आत्महत्येची पाऊलही उचलत आहेत. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे अशी पिढी निराश होणे हे राष्ट्राच्या हिताचे नाही असे सांगत सरकारने ‘आता तरी जागे व्हावे’, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला केले आहे. (mp sambhaji rane appeals aghadi govt for maratha reservation after suicide of a maratha youth)
सरकारने आता तरी जागे व्हावे…!
खासदार संभाजीराजे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, ‘परतूर तालुक्यातील येनोरा (जि. जालना ) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरुण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे.’
क्लिक करा आणि वाचा- चिंता अधिकच वाढली; राज्यात आज करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, मात्र ‘हा’ दिलासा!
संभाजीराजे पुढे लिहितात की, ‘आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.’
‘सरकारची दिशाभूल होत आहे’
प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही संभाजीराजेंनी केला आहे. सरकारला माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी सरकारला केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
सदाशिव भुंबर यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना शेवटी खासदार संभाजीराजे यांनी समाजातील तरुणांना कळकळीची विनंती करताना म्हटले आहे की, ‘मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हिच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिम्मत हरू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ.’
क्लिक करा आणि वाचा- दहशतवादी जानचे डी कंपनीशी दोन दशकांपू्र्वीचे संबंध; एटीएस पथक दिल्लीला जाणार