कॉलिंग नेम प्रेझेंटेशन
कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) असे या फीचरचे नाव असून संपूर्ण भारतीय दूरसंचार नेटवर्कवर आणि भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांवर पूरक सेवा म्हणून हे फीचर आणले जावे अशी सूचना ट्रायतर्फे करण्यात आली आहे. नियामकाने सुचवलेले नाव, क्रमांकासाठी नोंदणी करताना वापरलेले नाव असावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. व्यावसायिक कनेक्शनच्या बाबतीत, सदस्यांना ‘चॉईस नेम’ पर्याय द्यावा असेही सांगण्यात आले आहे.
ट्रू कॉलरला स्पर्धा
गेली अनेक वर्षे स्पॅम आणि स्कॅम कॉलरला लेबल करण्यासाठी कार्यरत असलेलल्या ‘ट्रू कॉलर’ सेवेला यामुळे स्पर्धा निर्माण होणार असल्याचे बोलले जात असले तरी या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे Truecaller च्या प्रवक्त्याने सांगितले. 374 दशलक्ष युजर्सच्या विश्वासाबरोबरच ए आय सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आम्ही ग्राहकांना योग्य सेवा पुरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मर्यादित लाभार्थी
या सेवेच्या सल्लामसलत दरम्यान, देशातील तीन सर्वात मोठ्या खाजगी कंपन्या TSPs – Airtel, Jio आणि Vodafone Idea – म्हणाले की, CNAP लागू केल्याने कॉल सेट अप वेळ वाढून सर्व्हिस क्वालिटीवर परिणाम होईल. अशा सेवेसाठी मोठी गुंतवणूक लागेल तसेच केवळ 4G ॲक्टिव्हेटेड फोनच CNAP ला सपोर्ट करू शकतात त्यामुळे अनेक जण या सेवेपासून वंचित राहतील.
ग्राहक प्रायव्हसीवर परिणाम
ग्राहक त्यांचे नाव कॉल केलेल्या पार्टीसोबत शेअर करण्यास इच्छुक नसण्याची असंख्य कारणे असू शकतात. अशा सेवेतून फसवणूक, गैरवर्तन, सोशल मीडियाचा पाठलाग इत्यादींचा धोका असल्याचे मतही या सेवेबद्दल व्यक्त केले जात आहे.
इतर सेवांपेक्षा CNAP वेगळी कशी?
ट्रू कॉलर, भारत कॉलर आयडी आणि अँटी स्पॅम सारख्या सेवा देखील कॉलिंग करणाऱ्या युजर्सची नावे दाखवतात तसेच स्पॅम रिपोर्टही देतात. परंतु हा सर्व डेटा इतर युजर्सकडून गोळा केलेला असतो, त्यामुळे त्याची विश्वासार्हता कमी असते.