हायलाइट्स:
- पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वीज चोरी
- एकाच दिवशी पाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अचानक तपासणी
- महावितरणने केली मोठी कारवाई
कोल्हापूर : ऑगस्टनंतर पश्चिम महाराष्ट्रात वीज चोरीचे प्रमाण प्रचंड असल्याचा पुरावाच महावितरणाला मिळाला आहे. एकाच दिवशी पाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अचानक तपासणी केली असता २ हजार २३७ ठिकाणी वीजचोऱ्या आणि विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आला. अशा वीजचोरांकडून एका दिवसात तब्बल साडे तीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बिलांचा भरणा न करणाऱ्या वीज चोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. सोबतच वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक (प्र.)अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली. त्यानंतर या महिन्यात चार दिवसांपूर्वी ही मोहीम राबवण्यात आली.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरीविरोधात कारवाई सुरु केली. यामध्ये दिवसभरात पाचही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या १८ हजार ३७ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२३७ ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे २० लाख ६६ हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आल्याने त्याची वसुली करण्यासाठी सुमारे ३ कोटी १८ लाख २५ हजार रुपयांचे वीजबिल संबंधीत ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात १०६६ ठिकाणी १ कोटी ९५ लाख ५७ हजार, सातारा जिल्हा- १४१ ठिकाणी ११ लाख ५३ हजार, सोलापूर जिल्हा- ६४७ ठिकाणी ६२ लाख ६० हजार, कोल्हापूर जिल्हा- १८२ ठिकाणी ४१ लाख ११ हजार आणि सांगली जिल्ह्यामध्ये २०१ ठिकाणी ७ लाख ४३ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.