हायलाइट्स:
- नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती
- अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळे
- उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड. जगदीश सावंत यांची नियुक्ती
अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत नेहमीप्रमाणेच यावेळीही उत्सुकता होती. अखेर राज्य सरकारने गुरूवारी नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, अनुराधा आदिक, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राहुल कनाल, सुहास आहेर व अविनाश दंडवते यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी राजकीय निर्णय होत नसल्याने आणि नंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही नियुक्ती दीर्घकाळ रखडली होती.
न्यायालयीन वाद टाळण्यासाठी सरकारने नियमावलीतही दुरूस्ती केली, मात्र त्या दुरूस्तीलाही आव्हान देण्यात आलं असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी आहे.
दरम्यान, अपेक्षितपणे यंदाही विश्वस्त मंडळात राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षांचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे.