मनसेच्या ज्येष्ठ-कनिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील वाद पक्षाच्या नवनिर्माणाला घातक ठरत असल्याचा इशारा अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्यानंतर स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटल्याचा देखावा निर्माण केला आहे. राज ठाकरेंच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ व कनिष्ठांनी एकत्र येत, एकजूट दाखविण्याचा प्रयत्न केला.
दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी ज्येष्ठ-कनिष्ठ अशा साऱ्याच पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयात बैठक घेऊन राज ठाकरे यांना अपेक्षित नवनिर्माण घडविण्याचा संकल्प केला.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशकात सक्रिय झाले आहेत. महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी ठाकरेंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली असताना नाशिकमधील मनसेत अंतर्गत वाद धुमसत आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून युवा फळीतील नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कुरबुरी सुरू आहेत. यासंदर्भात युवा फळीतील नेत्यांनी थेट पक्षाध्यक्षांकडे तक्रारी केल्यानंतर गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी नाशिक दौरा करीत कानपिचक्या दिल्या होत्या. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद पक्षासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे सर्वांनी एकजूट दाखवत नाशिकच्या नवनिर्माणासाठी महापालिकेवर पुन्हा एकदा मनसेचा झेंडा फडकविण्याचा मंत्र राज यांनी या दौऱ्यात दिला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी राज ठाकरे येत्या २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्वच स्थानिक नेत्यांनी एकजुटीचे दर्शन घडवित या दौऱ्याच्या पूर्वतयारीची बैठक घेऊन मनसेत सर्वकाही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, भाऊसाहेब निमसे, रामदास दातीर, योगेश लभडे, महिला सेनेच्या कामिनी दोंदे, अर्चना जाधव, अरुणा पाटील, सुजाता डेरे, स्वागता उपासनी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
एकजुटीने सामोरे जाऊ
या बैठकीत शहर अध्यक्ष अंकुश पवार यांनी राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचे स्वरूप सांगितले. तर जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी शाखा अध्यक्षांचा नियोजित मेळावा, संपूर्ण शहर भगवामय करण्याचा निर्धार व्यक्त करीत मनपाच्या परवानगीने विविध ठिकाणी फलक लावण्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीस पूर्ण ताकदीने व एकजुटीने सामोरे जाण्याचा तसेच ठाकरे यांना अपेक्षित नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी झटण्याचा संकल्प व्यक्त करीत आगामी मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांना मार्गदर्शन केले.