हायलाइट्स:
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आयकर विभागाचे छापे
- नागपूरमधील सिव्हिल लाइन परिसरातील घराची झडती सुरू
- अनिल देशमुख व त्यांची दोन्ही मुले घरी नव्हती
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या मागील चौकशीचे शुक्लकाष्ट सुरूच आहे. आयकर विभागानं आज पुन्हा एकदा देशमुख यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. नागपूर सिव्हिल लाइन परिसरातील घरी आयकर विभागाचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत. (Income Tax raids Anil Deshmukh’s Residence in Nagpur)
अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही या प्रकरणात जावे लागले. त्यामुळं संतापलेल्या सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे व अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.
वाचा: चंद्रकांत पाटील सक्रिय राजकारणातून बाजूला होणार? संजय राऊत यांचं वक्तव्य
मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. असं असलं तरी देशमुख यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं तपास यंत्रणांचं काम सुरूच आहे. याचाच भाग म्हणून आज नागपूर येथील घरी छापे मारण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागानं छापे टाकले तेव्हा अनिल देशमुख व त्यांची दोन्ही मुलं घरी नव्हती. त्यांच्या पत्नी व काही खासगी कर्मचारी घरी होते. आयकर अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.
वाचा: पंतप्रधान मोदींना अजित पवारांकडून शुभेच्छा; महाराष्ट्राचा उल्लेख करून म्हणाले…