हायलाइट्स:
- पारनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन
- अमोल मिटकरी यांनी केला नीलेश लंके यांच्या कामाचा गौरव
- नीलेश लंके यांच्या कामाची गाडगेबाबांच्या कामाशी तुलना
अहमदनगर: करोना योद्धा आणि साधा माणूस अशी ओळख निर्माण केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची तुलना आता थेट संत गाडगेबाबा यांच्याशी करण्यात आली आहे. ‘आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या रुपाने साक्षात गाडगे महाराजांचे दर्शन झाले,’ असे उद्गार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काढले.
आमदार लंके यांनी पारनेर तालुक्यात आणि इतरत्रही केलेल्या करोना रुग्णांच्या सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही त्यांच्या कामाचा गौरव करीत लंके यांचं काम दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यासारखे असल्याचे म्हटले होते. आता मिटकरी यांनी त्यांना गाडगे महाराजांची उपमा दिली आहे.
वाचा: शिवसेना-भाजप युतीबद्दल मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य; नारायण राणे म्हणतात…
पारनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होते. ते म्हणाले, ‘संत गाडगे महाराजांचे जीवन चरित्र, त्यांचे कार्य पुस्तकात वाचले होते. त्यांची भेट झाली नाही, मात्र पारनेर येथे आल्यानंतर आमदार लंके यांच्या रुपाने साक्षात गाडगे महाराजांचे दर्शन झाले. त्यांच्या माध्यमातून महाराजांच्या विचारांचा वारसा आम्हा सर्वांना मिळाला. लंके त्यांच्या मतदारसंघात संत गाडगेबाबा यांच्यासारखे काम करत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामात त्यांचे मोठे योगदान दिसून येत आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो रुग्णांना जीवनदान देणारे आमदार लंके हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीसाठी आदर्श राहिला पाहिजे यासाठी हंगा गावामध्ये शिवस्मारक उभारून लंके आदर्श काम करत आहेत. हंगा येथे उभारल्या जाणार्या शिवस्मारकासाठी मी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर करतो. लंके यांच्या माध्यमातून राज्याला दुसरे आर. आर. पाटील मिळाले आहेत. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले लंके खरे लोकनेते आहेत,’ असेही मिटकरी म्हणाले.
वाचा: कोल्हापुरात थरारनाट्य! पत्नीसमोरच तरुणानं केला प्रेयसीवर गोळीबार
यावेळी नीलेश लंके प्रतिष्ठानचे दादा शिंदे, सचिव अॅड. राहुल झावरे, शिक्षक नेते चंद्रकांत मोढवे, सरपंच बाळासाहेब दळवी, उपसरपंच वनिता शिंदे, दीपक लंके, ज्ञानदेव लंके, सचिन पठारे, बाळासाहेब खिलारी, राजेश शिंदे, चंद्रकांत ठुबे, भाऊसाहेब भोगाडे, अरुण पवार, सुहास नगरे, जगदीश साठे, राजू दळवी, सुदाम दळवी, राजू शिंदे, संतोष ढवळे, राजू लोंढे, संतराम दळवी, अशोक दळवी, सुहास नगरे, भाऊ पावडे उपस्थित होते.