हायलाइट्स:
- मंचावरच राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली ओढला
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
- अजित पवार यांनीही राज्यपालांना लगावला टोला
पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्य सरकारसोबतच्या संघर्षामुळे चर्चेत असतात. मात्र आता वेगळ्याच कारणासाठी त्यांची चर्चा होत आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली ओढल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांच्या या कृतीनंतर मंचावर चांगलाच हास्यकल्लोळ झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी पुण्यात होते. यावेळी राज्यपालांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड परिसरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ही सायकल रॅली होणार होती. राज्यपालांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसंच यावेळी राज्यपालांनी एका महिला सायकलपटूचा सत्कारही केला. मात्र हा सत्कार करत असतानाच राज्यपालांनी सदर महिलेच्या तोंडावरून मास्क हटवला.
राज्यपालांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र एकीकडे शासन-प्रशासनाकडून कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असतानाच राज्यपालांनीच भर कार्यक्रमात एका महिलेच्या चेहऱ्यावरील मास्क हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांना टोला लगावला आहे. ‘राज्यपाल महामहीम आहेत. त्यांनी काही केलं तर त्यावर मी बोलू शकत नाही. राज्यपालांनी शपथ देताना आम्हाला मास्क काढायला सांगितला तर आम्हालाही मास्क काढावाच लागेल,’ अशी तिरकस प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.