हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करणार?
- मुख्यमंत्र्यांनी टोला लगावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- शिवसेना-भाजप युतीबाबतही केलं भाष्य
कोल्हापूर : ‘महाविकास आघाडीतील एका पक्षात मी प्रवेश करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य शुद्ध वेडेपणा आहे,’ असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil Criticizes CM Uddhav Thackeray) यांनी कोल्हापुरात बोलताना केला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील हे कदाचित महाविकास आघाडीतील एका पक्षात येणार असतील, असा टोला लगावला होता. त्याबाबत कोल्हापुरात पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी प्रतिटोला हाणला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. आपले राजकीय भवितव्य ठरवण्याचा अधिकार हा फक्त भाजप आण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांना आहे. कारण मी त्यांच्या संस्कारात वाढलो आहे.’
भाजप-शिवसेना युती होणार?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानानंतर भाजप-शिवसेना युतीच्या चर्चांनी पुन्हा वेग पकडला आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी हे सकारात्मक विधान कोणत्या आधारावर केले याची आपण त्यांच्याकडे चौकशी करू. त्यांच्या मनात नेमके काय आहे हे कळायला आपण काय ज्योतिषी नाही,’ असं पाटील म्हणाले.
दरम्यान, कोल्हापुरातील भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा निर्वाळाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना जोरदार विरोध करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ही लोकशाही आहे. लोकशाहीत विरोध करण्याचा सर्वांना अधिकार आहे.