तुळशी
तुळस अतिशय पवित्र मानली जाते आणि सर्व शुभकार्यात तुळशीचा वापर केला जातो. पण भगवान महादेवच्या पूजेत तुळशीचा वापर वर्जित सांगितला आहे. अर्थात यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केल्यानंतर तुळस क्रोधित होते आणि ती स्वतःला भगवान शिवाच्या पूजेपासून वंचित ठेवते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत तुळशी वापर केला जात नाही.
शंख
भगवान महादेवाला शंखाने जलाभिषेक करू नये. यामागेही एक पौराणिक कथा मिळते. या कथेनुसार शंखचूड नावाचा एक असुर सर्व देवी देवतांना त्रास देत होता. भगवान शिवाने त्रिशूळाने शंखचूड असुराचा वध केला. यात असुराचे सारे शरीर भस्म होते आणि या भस्मापासून शंखाची उत्पत्ती होते. भगवान शिवाने शंखचूडचा वध केला होता, यामुळे शिवपूजनात शंखाचा वापर केला जात नाही.
हळद
किती तरी असे धार्मिक विधी आहेत, ज्यामुळे हळद वापरली जाते. पण भगवान शिवाच्या पूजेत मात्र हळद वापरणे वर्जित सांगण्यात आलेले आहे. शास्त्रांनुसार हळद स्त्रीशी संबंधित आहे आणि शिवलिंगाला पुरषतत्व मानले जाते. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत हळद वापरली जात नाही.
अखंड अक्षता
कोणत्याही शुभ आणि मंगलकार्यात अक्षता वापरली जाते. शिवलिंगावर नेहमी अखंड अक्षता वापरली पाहिजे. तुटलेले तांदूळ चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नये कारण अक्षत हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवलिंगावची पूजा करताना ५ ते ७ अखंड अक्षता वापराव्यात.
केतकीचे फूल
शिवलिंगावर केतकी, केवडा फूल, चंपा, कण्हेर अशी लाल रंगाची फुले अर्पण करू नये. या फुलांव्यतिरिक्त इतर फुले अर्पण करावीत. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते. पण वर्जित फुलांचा वापर केल्याने भगवान शिव क्रोधित होतात.
कुंकू आणि शेंदूर
सर्व देवीदेवतांना कुंकू आणि शेंदूर अर्पित करता येते पण शिवलिंगावर ते अर्पण करणे वर्जित आहे. शिवलिंगावर तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता. तसेच हळद ही स्त्रीतत्वाची असल्याने शिवलिंगावर अर्पण करू नये.