पंतप्रधान मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच…; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

हायलाइट्स:

  • आगामी निवडणुकांसाठी भाजपची सावध पावलं
  • शिवसेनेनं केलं भाजपच्या रणनितीवर भाष्य
  • पंतप्रधान मोदी व नड्डा यांच्या भूमिकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया

मुंबईः ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी २०२४च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे,’ असं शिवसेनेनं (Shivsena) म्हटलं आहे.

सामनाच्या आजचा अग्रलेखात शिवसेनेनं आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या रणनितीवर भाष्य केलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात बदल तसंच, गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळ याबाबत ही शिवसेनेनं भाष्य केलं आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी ही भाजपची रणनिती असल्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

‘तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणायचे ते इथे,’ असा टोला शिवसेनेनेनं लगावला आहे.

वाचाः पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना नेत्याची मध्यस्थीची तयारी

‘भाजपच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करुन टाकले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी- नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘मोदी आता सत्तर वर्षांचे झाले. त्यामुळे त्यांची पावले अधिक दमदार पद्धतीने पडत आहेत आणि वाटेतले काटेकुटे ते स्वतःच दूर करीत आहेत. मोदी राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच त्यांनी पक्षातील अनेक जुन्या-जाणत्यांना दूर करून मार्गदर्शक मंडळात नेमले. म्हणजे हे मार्गदर्शक मंडळ कामापुरते नसून उपकारापुरतेच ठेवले. आडवाणी, मुरली मनोहर जोशी हेसुद्धा त्याच मार्गदर्शक मंडळात बसून आहेत. कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील फेररचनेत अनेक जुन्यांना मोदी यांनी घरचा रस्ता दाखवून नव्यांना स्थान दिले. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची वेळ आली,’ असा टोमणाही शिवसेनेनं मारला आहे.

वाचाः
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील भडकले

‘मोदी यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे व त्या कामी सूत्रे स्वतःकडे ठेवण्याचे ठरवले आहे. देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे. लोकांत तसेच विरोधकांत मोदींच्या कार्यपद्धतीविषयी जो रोष दिसतोय त्यास स्वतः मोदी किती जबाबदार व त्यांच्या अवतीभवतीचेलोक किती कारणीभूत हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली व त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली. गेल्या काही महिन्यांत एक आसाम सोडले तर प. बंगाल, तामीळनाडू, केरळात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘प. बंगालात तर अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली होती. केरळात ई. श्रीधरनसारखा मोहरा कामी लावला होता. अमित शहा हे कोणताही चमत्कार घडवू शकतात अशी प्रचार मोहीम राबवली गेली, पण अमित शहा यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा पडला व आता तर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. प. बंगालातही कपाळमोक्ष झाला. जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे ते यामुळेच’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Source link

lok sabha electionShivsenashivsena on pm modishivsena vs bjpपंतप्रधान मोदीलोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment