हायलाइट्स:
- मुंबई लोकल ट्रेनवर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट
- दिल्लीत अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून माहिती समोर
- मुंबईत रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात मोठी वाढ
मुंबई: दिल्ली सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून मुंबईसह सर्व प्रमुख शहरातील सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. मुंबईत एटीएस व गुन्हे शाखेनं आज पहाटे एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचवेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई लोकलवर विषारी गॅसच्या साहाय्यानं हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागानं रेल्वे पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्याचं समजतं.
गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर मुंबई लोकल स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही संशयास्पद आढळल्यास कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
वाचा: ‘…म्हणून पेट्रोल, डिझेल GST च्या कक्षेत आणणं धोक्याचं’
दिल्ली पोलिसांनी अलीकडंच सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांनी मुंबई लोकलला लक्ष्य करण्याचा कट रचला होता. त्यासाठी मुंबई लोकलची रेकी देखील करण्यात आली होती. त्यामुळं खळबळ उडाली असतानाच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा व एटीएसच्या संयुक्त पथकानं आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. झाकीर असं त्याचं नाव असून त्याला जोगेश्वरीतून ताब्यात घेण्यात आलं आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या जान मोहम्मद अली शेख याचं मुंबई कनेक्शन उघड झालं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती.
वाचा: मोठ्या माशांच्या बंदोबस्ताचे काय?; ‘फिश कॅच रिपोर्ट’वर मच्छिमारांचा सवाल
गर्दीची ठिकाणं हे दहशतवाद्यांचं प्रमुख लक्ष्य असतं हे यापूर्वीच्या हल्ल्यातून स्पष्ट झालं आहे. मुंबई लोकल हे दहशतवाद्यांचा सॉफ्ट टार्गेट आहे. यापूर्वीही मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवून हल्ले करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात असाच हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लान आहे. लोकल ट्रेनमध्ये विषारी गॅस हल्ला करून किंवा गर्दीच्या स्थानकांवर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.