हायलाइट्स:
- भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार
- राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिला आक्रमक इशारा
- कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं
कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या अस्मितेला आव्हान देत जर भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार असतील तर त्यांना अडवून कोल्हापुरी हिसका दाखवू,’ असा इशारा राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरू आहे. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.
सोमय्या यांच्याविरोधात अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी लोकवर्गणीही जमा करण्यात येत आहे.
कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्स उभारणीबरोबरच इतर काही प्रकरणात मंत्री मुश्रीफ यांनी १२७ कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर मुश्रीफ समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करत निषेध व्यक्त केला. सोमय्यांचा आरोप खोटा व निराधार असल्याचा खुलासा करतानाच माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीचा शंभर कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला. या पार्श्वभूमीवर न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी जी रक्कम भरावी लागते, त्यासाठी कागल तालुक्यातून लोकवर्गणी काढण्यात येत आहे. कागल शहरातून २५ लाख तर गडहिंग्लजमधून १० लाख रूपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली. त्याची सुरुवातही झाली असून पहिल्याच दिवशी सहा लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.
एकीकडे ही सर्व तयारी सुरू असताना सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येणार आहेत. ते सरसेनापती घोरपडे कारखान्यास भेट देण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, माजी नगरसेवक राजू लाटकर, अदिल फरास, सुनील देसाई यांनी पत्रकार बैठक घेतली.
पोवार यांनी सांगितले की, मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरचे लोकनेते आहेत. त्यांच्यावर आरोप केले, तक्रार केली, आता न्यायालयात त्याचा काय तो निर्णय होईल. पण कोल्हापूरच्या अस्मितेला आव्हान देत सोमय्या जर कोल्हापुरात येत असतील तर त्यांना रेल्वे स्थानकावरच अडवले जाईल. त्यांना तेथेच कोल्हापुरी हिसका दाखवला जाईल. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितलं की, सोमय्या यांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील ५० हजार कार्यकर्ते सोमवारी कागल येथे जमा होतील. यातून कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी आमची राहणार नाही. सोमय्या कितीही बंदोबस्तात येवू दे, त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवणारच असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन पक्षाने केले होते. पण त्यांची प्रकृती बिघडल्याने सध्या त्यांना उपचारासाठी मुंबईत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते रविवारी कोल्हापुरात येण्याची शक्यता कमी आहे.