हायलाइट्स:
- दुर्मिळ असलेल्या शेकरूची थेट विक्री
- आरोपीला ताब्यात घेण्यात आलं
- वन खाते तस्करीचे रॅकेट उघडकीस आणणार?
नाशिक : महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि दुर्मिळ असलेल्या शेकरूची थेट विक्री सुरू असल्याची गंभीर बाब वनविभागाने उघडकीस आणली आहे. शनिवारी सायंकाळी कॉलेज रोडवरील एका पेट्स शॉपमधून शेकरूला रेस्क्यू केले असून, दुकान मालक सौरव रमेश गोलाईत (२३, रा.दसक, जेलरोड) याला ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयित दुकान मालक गोलाईत याच्याविरूद्ध यापूर्वीही वन्यजीवांच्या तस्करीचा गुन्हा दाखल असून, शहरातील हायप्रोफाइल वस्तीमधील वन्यजीवांच्या तस्करींचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शेकरू हा वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१ नुसार संरक्षित असून, त्याची विक्री व तस्करी कायद्याने गुन्हा आहे. तरीही कॉलेज रोड परिसरातील जेहान सर्कलपासून जवळ असलेल्या ‘सौरव एक्झॉस्टिक व ॲक्वेटिक पेट स्टोअर’मध्ये शेकरूला विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पश्चिम वन विभागाला मिळाली. या दुकानात शनिवारी सायंकाळी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्यासह धाड मारली. त्यावेळी चार वर्षांचा शेकरू वन्यप्राणी पिंजऱ्यात बंदिस्त असल्याचे दिसले. त्यावेळी दुकान मालक गोलाईत याला ताब्यात घेण्यात आले.
गंभीर बाब म्हणजे, राज्य प्राणी असलेला शेकरू पश्चिम घाटातील समृद्ध जंगलात आढळत असून, काळानुरूप त्यांची संख्या कमी होत आहे. अत्यंत लाजाळू वन्यजीवांवर तस्करांची नजर पडल्याने संताप व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत गोलाईतविरूद्ध गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. शेकरूची विक्री व जवळ बाळगणे हा अजामीनपात्र गुन्हा असून, सात वर्षांच्या कारवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
रॅकेट उघडकीस येणार?
संशयित गोलाईत याला दोन वर्षांपूर्वी मगरीच्या पिल्लांच्या तस्करीत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी जामिनावर सुटल्यानंतर गोलाईतने पुन्हा वन्यजीवांची तस्करी सुरू केल्याचे दिसले. मगरींच्या तस्करीबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे गोलाईवर कुणाचा वरदहस्त आहे का, यासह त्याच्यावर चार्टशीट दाखल करून वन खाते तस्करीचे रॅकेट उघडकीस आणते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.