हायलाइट्स:
- मुख्यमंत्र्यांकडून भाजपसोबत युतीचे संकेत?
- विश्वजीत कदमांनी उडवली भाजपची खिल्ली
- स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतही केलं भाष्य
सोलापूर :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्याने राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्क लढवले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या विधानातून पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत दिले आहेत का, अशी चर्चाही सुरू आहे. अशातच आता काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून भाजपला टोला लगावला आहे.
‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरळ व्यक्तिमत्त्व आहे. ते अनेकदा विनोद करत असतात. त्यामुळे भाजपबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हा विनोदाचा भाग असावा. त्याला फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही,’ अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली आहे. शनिवारी सोलापूर दौर्यावर आलेले विश्वजीत कदम काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
आगामी निवडणुकांबाबत काय म्हणाले विश्वजीत कदम?
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र लढाव्यात. कार्यकर्त्यांच्या भावना जपत त्यांना या निवडणुकांमध्ये संधी देणे ही पक्षाची नैतिक जबाबदारी आहे,’ असं म्हणत विश्वजीत कदम यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची भूमिका मांडली आहे.
‘पक्षासाठी कार्यकर्ते झटत असतात. राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला पाहिजे,’ असंही विश्वजीत कदम म्हणाले.