हायलाइट्स:
- ‘वैभव खेडेकर मनसेचे की राष्ट्रवादीचे? त्यांच्या आरोपांना आपण भीक घालत नाही’
- ‘वैभव खेडेकर दिशाभूल करणारे आरोप करत आहेत’
- शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवार
खेड : वैभव खेडेकर मनसेचे पक्षाचे आहेत कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे त्यांच्या आरोपाना आपण भीक घालत नाही असा पलटवार माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दि. १८ रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत असे कदम यांच्या म्हटले आहे.
माझी बदनामी करणारे जनमानसामध्ये, माझ्या पक्षामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या बाबतीत गैरसमज पसरवुन आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठी खेडेकर यांनी बेछुटपणे आरोप केले आहेत. त्यांचा मी धिक्कार करीत असुन तीव्रपणे निषेध करीत आहे अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या विरोधात जे आरोप केले होते, त्या संदर्भात ते न्यायालयात गेले होते. त्यांच्या विरोधात निकाल लागला तर १ महिन्यांसाठी त्यांना स्थगिती दिली आहे. त्याचा विपर्यास करून जणू काय न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली असे भासवून शिमगा सण त्यांनी साजरा केला, याचे मला आश्चर्य वाटते अशीही बोचरी टिका कदम यांनी केली आहे.
इंधन घोटाळा कोणी केला? नगरपरिषदेच्या पैशांची लूट कोणी केली? हे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सांगायला हवे होते, पुढे चौकशीमध्ये योग्य ते निष्पन्न होईलच. किरीट सोमय्या यांना भेटून अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली हा जावईशोध वैभवरावानी लावलेला दिसतो. फक्त आमच्या कुटुंबांमध्ये भांडणे लावण्यासाठी हे कट कारस्थान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे किंवा विधानसभेच्या निवडणुकिच्या वेळी मातोश्रीच्या पायऱ्या व माजी पालकमंत्र्यांच्या पायऱ्या ज्यांनी शिवसेनेतुन तिकीट मागण्यासाठी झिजवल्या ‘त्या’ नेत्याच्या मैत्रीचा हा परीणाम असावा असे वाटते असा टोला त्यांनी माजी आमदार संजय कदम यांचे नाव न घेता लगावला आहे.
निवडणुकी पुर्वीच मी पत्रकार परीषद घेऊन यापूढे मी कोणतेही पद घेणार नाही असे जाहिर केले होते. त्यामुळे मंत्री होण्याचा व नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तमाम महाराष्ट्रातील जनता रामदास कदम यांना चांगली ओळखते. महाराष्ट्राने, कोकणाने व शिवसेनेने माझ्यावर भरभरुन प्रेम केले आहे. त्याची परतफेड या जन्मी होऊ शकणार नाही. अश्या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालीत नाही. आकाशाकडे बघुन थुकले कि थुंकी आपल्याच तोंडावर उडते याचे भान वैभव खेडेकर यांना नाही. शेवटी सत्य हे आहे ते जनतेपुढे येईलच व भ्रमाचा भोपळा फुटेल असाही टोला आ. रामदास कदम यांनी या पत्रकात शेवटी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कोकणात खेडमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगणार आहे.