ना ढोल-ताशांचा गजर, ना भक्तांची गर्दी; लालबागचा राजाला भावपूर्ण निरोप

मागील वर्षी करोनासंसर्गामुळे मुंबईतील अनेक मंडळांनी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कृत्रिम तलावांमध्ये त्यांचे विसर्जन केले होते. लालबाग राजासारख्या काही मंडळांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठाच केली नव्हती. यंदा जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांनी चार फुटांच्या गणेशमूर्ती विराजमान केल्या आहेत. (फोटोः कल्पेशराज कुबल)

बाप्पाला निरोप देताना डोळे पाणावले

यंदा लालबागच्या राजाची चार फुटाची मूर्ती बसवण्यात आली होती. विसर्जनासाठीही राज्य सरकारने निर्बंध जारी केले होते. विसर्जन मिरवणुकीत फक्त दहा जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं नेहमी वाजत गाजत बाप्पाला निरोप देणाऱ्या भाविकांना यंदा बाप्पाला निरोप देताना डोळे पाणावले होते.

राजाची मिरवणूक

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही लालबागहून पुढे दक्षिण मुंबईतील विविध महत्त्वाच्या भागातून मार्गक्रमण करते. यंदाच्या वर्षीही याच मार्गावरून लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाली. भाविकांना मंडपात लालबागचा राजाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. परिणामी विसर्जनावेळी मुंबईच्या रस्त्यावर मार्गक्रमण करताना राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता असल्यानं मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक

दरवर्षी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाल्यानंतर परळ, गिरगाव परिसरातील भाविक खिडक्यांमधून, इमारतीतून तर बाप्पाच्या मार्गात तासन् तास उभं राहून राजाचा रथ येण्याची वाट पाहत बसायची. प्रत्यक्ष मंडळात दर्शनासाठी जायला न मिळालेले भाविक विसर्जनासाठी जाणाऱ्या बाप्पाच्या चरणी माथा टेकत आशीर्वाद घ्यायचे. मात्र, करोनामुळं यंदा भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे आशीर्वादही लांबून घ्यावे लागत आहेत.

लालबागच्या राजासाठी आकर्षक रथ

करोना प्रतिबंधक निर्बंधांच्या चौकटीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळांनी विविध शक्कल लढवल्या आहेत. वाजतगाजत बाप्पाला निरोप देता येणार नसला तरी लालबागच्या राजाची खास फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली आहे.

गर्दी रोखण्याचे आव्हान

करोनासंसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी त्यांना करावी लागणार आहे. यासाठी विसर्जन मार्ग, तसेच चौपाट्यांवरील गर्दी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पोलिसांनी पार पाडावी लागणार होती.

मुंबई पोलिस ऑनड्युटी

अनंत चतुर्दशीला सर्व मुंबई पोलिस ऑनड्युटी असणार आहेत. त्याचबरोबर सशस्त्र विभाग आणि विशेष शाखांमधील १०० अधिकारी आणि दीड हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. एसआरपीएफच्या तीन तर, सीआरपीएफची एक तुकडी राखीव ठेवण्यात आली आहे. ५०० होमगार्डसह बाहेरील युनिट्समधील २७५ कॉन्स्टेबलची मदत घेण्यात आली आहे.

(फोटोः साई वाव्हळ)

लालबागच्या राजाचे विसर्जन

‘मुंबईचा राजा, गणेशगल्ली’ या उत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार आहे. सकाळी मुंबईच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन पार पडले. तर, संध्याकाळी चार नंतर लालबागच्या राजाचे विसर्जनाला सुरुवात होणार आहे. चौपाटीवर भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चौपाटीवर कोणतीही गर्दी होणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत.

Source link

lalbaugcha raja immersion livelalbaugcha raja photolalbaugcha raja visarjan 2021lalbaugcha raja viserjanलालबागचा राजालालबागचा राजा विसर्जन मिरवणूक
Comments (0)
Add Comment