हायलाइट्स:
- पिंपरीत ‘या’ स्पामध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार
- छापा टाकताच पोलिसही हादरले
- वेश्या व्यवसायातून चार महिलांची सुटका
पिंपरी : वाकड येथील ग्रीन व्हिलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने सेंटरवर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यावसाय करत असणाऱ्या चार महिलांची सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केली. तसेच स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करण्यात आली. शुक्रवारी (१७ सप्टेंबर) रात्री ही कारवाई करण्यात आली.
स्पा सेंटर मॅनेजर दीपक नामदेव साळुंके (वय २४, रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. धुळे) आणि अमित विश्वनाथ काटे (वय ३२, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पा सेंटर मॅनेजर दीपक याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती, वाकड येथे ग्रीन व्हिलेज स्पा या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई करण्यात आली.
आरोपी चार महिलांना पैशांचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून आरोपी आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.