हायलाइट्स:
- मुलीच्या वडिलांनी जावयावर चाकूने केला हल्ला
- आंतरधर्मीय विवाहाचा होता राग
- जखमी जावयावर रुग्णालयात उपचार सुरू
सांगली : मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी जावयावर चाकूने हल्ला केला. या घटनेत जखमी झालेला जावई युवराज अशोक काकडे (वय २५, रा. माळवाडी, ता. मिरज) याला उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत जखमी युवराज काकडे याचा भाऊ अक्षय अशोक काकडे (वय २८) याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हल्ला करणारा सासरा बालेचंद मौला तांबोळी (वय ५०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय काकडे याचा भाऊ जखमी युवराज काकडे हा मिरज तालुक्यातील माळवाडी येथे त्याच्या कुटुंबियांसह राहतो. त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणीशी युवराजचे प्रेमसंबंध होते. यातून काही दिवसांपूर्वी दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. त्याचा राग मुलीच्या वडिलांना होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास युवराज काकडे हा वांजोळे मळा येथे महावितरण विभागाचे पोल ट्रॅक्टरमध्ये ठेवत असताना बालेचंद तांबोळी यांनी अचानक जाऊन युवराज याच्यावर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात युवराज याच्या खांद्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली. घडलेल्या या प्रकारानंतर जखमी युवराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी युवराजचा भाऊ अक्षय काकडे याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून चाकू हल्ला करणारे बालेचंद तांबोळी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.